Powered By Blogger

Friday, June 12, 2009

नशीब...


तिचं माझ्या शेजारी
रोज बेंचवर बसणं
मोहून टाकायचं मला
तिची सोबत असणं

भूरभुरणारे केस त्यात
दोन गुलाबाच्या पाकळ्या
अलगद खुलल्या की
पडती गालावर खळ्या

नकळत होणारा स्पर्श
तिचा हवाहवासा वाटे
एक कटाक्ष टाकता तिने
मनात वादळ उठे

दोन वर्षे लोटली तरी
हिम्मत नाही झाली
उगाच मैत्रीत दुरावा
अशी मनात भिती आली

शेवटच्या वर्षाची
कोलेजची शेवटची भेट
ठरवलं पक्कं आज
तिला विचारेन थेट

ती आली समोरुन
शेजारी बेंच्वर बसली
टाकत एक कटाक्ष
हळूच गालात हसली

हातातलं ग्रिटिंग देत
म्हणाली हे तुझ्यासाठी
किती रे बावळट तू
वाच हे आत्ता माझ्यासाठी

प्रत्येकवेळी वर्तुळ काढताना
तुझ्या विचारांत असंच होतं
काढता काढता वर्तुळ
ते हृदयाचाच आकार घेतं

आनंदाला नव्हतं मोल
कानी फ़क्त तिचेच बोल
विश्वास खोटा ठरला नाही
मी माझाच उरलो नाही

हिवाळे पावसाळे मग
धुंद वाटू लागले
माथेरान माळशेज माथी
प्रितिचे ढग दाटू लागले

अन एक दिवस अचानक
संकट होतं लोटलं
राहतं घर सोडून त्यांनी
दुसरं शहर होतं गाठलं

खूप प्रयत्न केला
म्हटलं तिला एकदा भेटावं
काय झालं अचानक
याचं कारण शोधावं

तेंव्हा ती म्हणाली
बाबांनी लग्न ठरवलं
खूप प्रयत्न करुनही
मी तुझं अस्तित्व हरवलं

बाबांच्या प्रेमापोटी
शेवटी माझा नाईलाज
पुन्हा नाही भेटायची मी
ही शेवटची भेट आज

तिथेच सारं संपलं
क्षणात सारं कोलमडलं
पुन्हा तसाच असहाय्य
वतुळाचं गणितच नाही उलगडलं

तिचं लग्न झालं
अन दीड वर्ष उलटलं
तिचीच आठवण काढत
माझं शरीर खालावलं

नियतीने मांडला खेळ
बघा कशी आली वेळ
पुन्हा शेजारीच ती येउन बसली
नजर चुकवत किंचितशी हसली

विस्कटलेले केस त्यात
सुकलेल्या पाकळ्या
खुलणार नाहीत आत्ता
बुजुन गेल्या खळ्या

मी तसाच निशब्द
हे असं कसं झालं
माझं गुलाबाचं फ़ुल
कसं वाळून गेलं

बाबांच्या प्रेमापोटी
लग्नानं झाली बेजार
नाही मिळालं सुख
जडला मरणाचा आजार

तिने यातना भोगल्या
असहय्य वेदना सोसल्या
येवुदे आत्ता सुखी मरण
या इच्छेने रात्री जागल्या

अन ती होती शेजारीच
बेड नं १०७
एकटीच विवळत पडलेली
मरणाशी करत दोन हात

आजही तिचा स्पर्श
हवावासा वाटणारा
सहवास तिचा जणू
स्वर्गाचा रस्ता गाठणारा

हळूच तिचा हात धरता
थोडी ती सुखावली
तसाच रे बावळट अजून
म्हणत ती रागावली

म्हणाली मी तुला दुखवलं
तुझी मी अपराधी
म्हणूनच आत्ता मरण
अशी ही असहय्य समाधी

अगं देवाचे आभार मान
की त्याला शेवटी कळलं
कितीही झालं तरीही
आपलं प्रेमाचं नातं जुळलं

बस्स…..आत्ता काही नको
असचं हात धरुन डोळे मिटू
ईथे नाही झालं पूर्ण स्वप्न
चल……तडक स्वर्ग गाठू….


……..अमरीश अ. भिलारे.

No comments:

Total Pageviews